top of page
Writer's pictureYogesh Kardile

भारत एक अनुभूती 



गुढी पाडव्याच्या  हार्दिक शुभेछ्या . आता जवळपास सर्व जगच  थांबलेले आहे . त्यामुळे घरात बसून खिडकीतून  अंगणातून तुम्ही निसर्ग कसा बदलतोय ते निवांत पाहू शकता . 


लिंबाला आलेला बहर, पोपटी रंगाची  पाने , आंब्याला पण कैऱ्या आलेल्या आहेत. आणि कधी नव्हे ते खूप सारे चिवचिवाट करणारे पाहुणे  मजेत  उडत आहेत . सध्या आपण घरात असल्यामुळे त्यांचं अस्तित्व जास्त जाणवतय. कदाचित  सक्तीच्या सुट्टीने आपल्या आयुष्यात हरवलेला सूर गवसला असेल . पण मन आता शांत आहे. 


सर्व पशु पक्षी मजेत बाहेर आहेत, रस्त्यावर फुलांचा सडा पडलाय आणि एकंदरच सर्व खूप छान  वाटतेय नाही ? आपण रस्त्यावर नसताना जग सुंदर दिसतंय . म्हणजे आपल्याशिवाय कुणाचेही काहीही अडलेले नाहीय. मग का एवढा आटापिटा ? हा प्रश्न  देखील निश्चितच पडला असेल . सर्वांनाच  कधीनाकधी तो ग्रासतो. पण तो मनात येणे हेदेखील महत्वाचे आहे .  

सुरवातीलाच हे लिहिण्याचे कारणकी हे २१ दिवस आपणास दिले त्याचे आपण पुढे काय करणार ?


ज्या घरात आपण राहतो  किंवा ज्या कार्यालयात आपण जातो, ज्या बागेत आपल्या मुलांना फिरवायला आपण घेऊन जातो , एखाद्या मॉल मध्ये शॉपिंग करतो या सर्व  निर्मित वास्तूकौशल्याचे प्रतीक आहे. आणि त्या निर्मिती वा स्वप्नपूर्तीचा सार्थ अभिमानदेखील आहे. कल्पना करा आपल्यापैकी अनेकजण या धरातलावरून नाहीसे झालो. आणि दोन तीनशे वर्षांनी जो पुढचा मानव येईल तो या कचऱ्याकडे पाहून काय विचार करेल ? आपली सर्वात उत्कृष्ट इमारत, कलाकृती एक हजार वर्षांनी  कशी दिसेल ? कदाचित ती भुईसपाट झालेली असेल, ऊन वारा, पाऊस याने गळून विस्कटलेली असेल. अशा अनेक मोठ्या इमारती  तुम्हाला आजही प्रत्येक शहरात पाहावयास मिळतील.  




निश्चितच काही कलाकृती असतील पण तुम्हाला देखील माहित आहे कि आपण पुढच्या मानवासाठी सिमेंटचे आणि प्लास्टिकचे डोंगर सोडून जाणार आहोत. आपली कुठली आधुनिक इमारत किंवा कलाकृती इतिहासकालीन गुहा, मंदिरे, शिल्प याच्याशी तुलना करू शकतील ?  पण तुम्हाला अजूनही तुमच्या लहानपणचे  गावाबाहेरच्या एक दगडी मंदिर , एखादी झाडाखालींची कोरीव समाधी किंवा विशाल अशी बारव / विहीर आठवत असेल. त्यांचे  वय १०० किंवां त्यापेक्षा जास्त वर्षे नक्कीच असेल. तुमच्याकडे तेथील काही आठवणी नक्कीच असतील. कंदहार ( अफगाणिस्तान )  ते ढाका ( बांगलादेश ) , नारानाग  ( काश्मीर ) ते कन्याकुमारी ( तामिळनाडू ) जर कोणी फिरला असेल तर त्याला लाखोंच्या संख्येत गुहा, मंदिरे, समाधी, कोरीव विहिरी, महाल, वाडे, घरे आणि बरेच काही दिसेल. आज हि संस्कृती तीन देशात विभागली गेलीय . परंतु त्यांना जोडणारा धागा हा हजारो वर्षांपासून एकाच आहे. आणि त्याची साक्ष असेल ती मानव निर्मित कलाकृती काहीशे किंवा हजार वर्षांपासून निसर्गाच्या प्रकोपाला तोंड देत उभ्या आहेत. 





वीस वर्षांपूर्वी ट्रेकिंगच्या वेडापायी सह्याद्रीत भटकंती करायला सुरवात केली, आदिवासी तरुण आणि शेतकरी यांच्या सोबत निसर्ग पर्यटनावर काम केले . त्यांना प्रशिक्षण दिले . शेकडो पर्यटकांना भंडारदरा  हरिश्चन्द्रगड परिसर दाखविला. मग वाटले  फक्त महाराष्ट्राचं का ?  गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूचा सह्याद्री देखील पाहायला हवा. त्यासाठी बेंगलोरला राहायला गेलो. मग पुढे ह्याच वेडाने मला हिमालय दाखवून असे करीत करीत अनेक राज्य पहिली . कधी पायी, तर कधी गाडी घेऊन, रेल्वे आणि विमानाने सर्व प्रकारचा प्रवास केला आणि करतोय. हे करताना मित्र, आई वडील, भाऊ, बायको आणि मुलगी या सर्वांना देखील फिरविले. आज घरी बसल्यावर असे वाटते जे जे मी काही सुंदर अनुभव घेतले आणि सर्वांसोबत वाटले त्यात जे सुख आहे तेच माझ्या सोबत राहील. त्या आठवणी छायाचित्रांच्या स्वरूपात मला आनंद देतात. 




अजिंठ्याच्या गुंफा , तिथला तो धबधबा आणि जंगल आठवले तरी आजही मन शांत करते . त्या शिल्पकारांची निर्माण करतानाची अवस्था कशी असेल ? छन्नीवर पडणारा हातोड्याचा घाव आणि बरोबर दगडाचा हवा तेवढाच टवका दूर करीत बुद्ध साकार कसा झाला असेल ?  बदामीच्या गुंफा आणि तेथील सुंदर मंदिर , समोरचा तलाव आणि मागील डोंगरातून येणार धबधबा ! शेकडो वर्षाच्या आक्रमणातून सुद्धा मार्तंड सूर्यमंदिर ( काश्मीर )  अजूनही उभे आहे . त्याची भव्यता आणि तुटले तरीही आपल्या सौंदर्याची ओळख करून देणारे शिल्प पाहून आपण  मनातल्यामनात शिल्पकाराला दाद देतो.  नर्मदेच्या जंगलातून जाताना नर्मदे हर म्हणत मार्गक्रमण करणारे हसतमुख यात्रेकरू. हजारो वर्षांच्या परंपरा एका पिढीतून दुसऱ्या पिढीत रुजविणारी लोक  पाहून वाटते कि आपल्याला भविष्य आहे.  गुलमर्गला मऊशार बर्फाच्या पाहिलेल्या लाटा, तसेच जैसलमेरहून पुढे दूरवर पसरलेले वाळवंटाच्या रेतीच्या लाटा किंवा मलपे वरील समुद्रकिनाऱ्याच्या निळ्याशार लाटा पाहिल्यावर वाटते जन्म सार्थकी लागला. 




खजुराहो ची मंदिरे, बेलूर, मदुराई, कांचीपुरम, जग्गनाथपुरी,  किंवा खिद्रापूरची मंदिरे असो. हे सर्व आपल्याला दाखवून देतात शेकडो वर्षांचा वनवास व उपेक्षा जरी भोगावी लागली तरी मानवाच्या सर्वोच्च विकासाचे प्रतिबिंब हे त्यांनी समाजाला कलाकृतीच्या रूपात कायम आहे. आणि हे निर्माण करण्यात सर्व प्रकारच्या लोकांचा हातभार काळात नकळत त्याला लागला. भारत हा बहुरंगी बहुढंगी देश आहे. एक जन्म पुरेसा पडणार नाही इतकी सुंदर स्थळे आपल्या देशात आहेत.  जगभरातून भारतात पर्यटक येतात. कितीतरी जण योग्अभ्यास, आयुर्वेद, नृत्यकला, पर्यटन, खाद्य संस्कृती जाणून घेण्यास येतात . इथे येऊन अडचण झाली तरी तक्रार न करता जास्तीत जास्त पाहून , शिकून , छायाचित्र काढून परत मायदेशी जातात . कारण भारताचे असणे हे सर्व जगासाठी एक प्रेरणा दायी गोष्ट आहे. मग जर आपला जन्मच इथे झाला तर आपण आपला देश मनापासून जाणून घ्यायला हवा कि नाही. देशाविषयी बोलायचे असेल तर आपल्या बांधवांना भेटायला हवे , नवीन मित्र बनवायला पाहिजेत . इंदोरी नाश्ता , काश्मिरी वाझवान, राजस्थानी आणि बंगाली मिठाई , स्पिती मध्ये तिबेटियन तींदुक, केरळातील पुट्टु , मुरुगन इडली आणखी बरेच काही. अनेको प्रकारचे नृत्य प्रकार , उत्सव यांची रेलचेल आपल्या देशात आहे.  पुढच्या पिढीला काय द्यायला हवे तर तो म्हणजे आयुष्याचा सर्वांगी अनुभव. देशाचे भविष्य घडविण्याचे असेल तर देश हा अनुभवायला हवा . 

कदाचित आपणास माहित नसेल पण आपण असे लोक आहोत ज्यांना उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू अनुभवायला मिळतात , वाहणाऱ्या  नद्या , ऊतुंग हिमशिखरे , घनदाट अरण्ये , वाळवंट , समुद्रातील बेट हे सर्वच आपल्या देशात आहे . आणि ते आपण बिनधास्त अनुभवू शकतो. 



आपण कोण आहोत ? आपली ओळख काय आहे ? सर्व भारतखंडाला बांधून ठेवणारा धागा काय ? ऐतिहासिक किल्ले, नद्या, पर्वत, जंगले या सर्वांचे आपल्या निर्मितीत योगदान आहे. आणि हे सौंदर्य याची देही याची डोळा प्रत्यक्ष पाहणे आणि आपल्या जवळच्या व्यक्तीस दाखविणे हे आपले कर्तव्य आहे. जेव्हा सर्व गोंधळ शमेल आणि कोरोना परत जाईल. आपल्याला परत आपले काम बोलाविले. नवीन जोमाने आपण देशाच्या अर्थ व्यवस्थेस हातभार लावू . काही लोक आपल्यात नसतील. जीवन हे क्षणभंगुर आहे याची प्रचित आज तर निश्चितच आपण सर्वांना येतेय. तरीही  अनेक लोक आपण जगण्यासाठी दिवस रात्र काम करताहेत. असेच त्याकाळातील  कलाकारांनी आणि  त्यांच्या दात्यांनी  विचार केला असेल. आणि जीवनाच्या सर्व अंगाने बहरणारी संस्कृती उभा केली . तिच्या खुणा सर्वत्र आपल्या जीवनात विखुरलेल्या आहे .मग त्या खानपान, औषधी, योग्, नृत्य, गायन इत्यादी असो. हजारो वर्षाचा अथक यज्ञ म्हणजे भारत. सर्व जगाची प्रेरणा म्हणजे भारत. निसर्गानुरूप जगणाऱ्या लोकांचा देश म्हणजे भारत. कुठेतरी आपण जेव्हा भरकटतो तेव्हा आपले मूळ शोधताना तुमच्यातच गवसेल तुम्हाला भारत. 





मला तुमच्या सोबत आम्ही अनुभवलेला भारत दाखवायला आवडेल . 

जर तुम्हाला देखील आमच्या सोबत या छयाचित्रांच्या , लेखाच्या स्वरूपात जोडायचे असेल तर आम्हाला नक्कीच आवडेल. या सक्तीच्या सुट्टीत आपल्या देशाला भेटूयात. 




21 views0 comments

Comments


bottom of page