जळी, स्थळी, काष्ठी आणि पाषाणी भगवंतच असतो असे जेव्हा आपले पूर्वज म्हणतात तेव्हा त्यांचा भाव हा निसर्ग आणि दैवत्व हे एकच आहे किंबहुना ते अभिन्न आहे याकडेच होता. त्यामुळेच निसर्गाकडे ओरबाडण्यापेक्षा त्याचे पुजन करण्याची वृत्ती त्यांच्या प्रगाढ ध्यानातुनच आली.
एक छायाचित्रकार म्हणून मी जेव्हा निसर्गाकडे पाहतो तेव्हा प्रत्येक गोष्टीत मला एक लय सापडते. कुठे रंग, अवकाश,पोत आणि माध्यम या सर्वात एक सौंदर्य दिसते. ती लय या ब्रम्हांडाचेच एक प्रतिबिंब असल्यासारखे वाटते. आपल्याला नाही परंतु त्यात राहणाऱ्या जीवांसाठी किंवा पेशींसाठी नक्कीच ते विश्व असेल.
झेन साधू म्हणतात कि प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. कुठलीही गोष्ट आपापल्या स्वधर्मानुसार जन्म घेत विकसित होऊन परत निसर्गाच्या कुशीतच विलीन होते. आणि या खेळालाच कदाचित भगवंताची लीला म्हंटले असेल. आपण फक्त मनापासून खेळ म्हणूनच खेळायचे. या विश्वाला अनुभवत आनंद लहरींवर स्वार व्हावयाचे.
जीवन हे नश्वर नसून शाश्वताचाच एक अनुभव फक्त एका देहात काही कालावधीसाठी आहे. पुन्हा दुसऱ्या खेळासाठी नवा देह मिळणारच. विवेकानंदांच्या म्हणण्यानुसार निसर्ग हा आपल्याला शिकविण्यासाठी आहे.त्यामुळे त्याच्या देखील मोहात पडावयाचे नाही. मग कधी जळ, काष्ठ, पाषाण, प्राणी, पक्षी किंवा मानव.
चैतन्य सर्वांमधून वाहत राहणार काया आणि जाणिवेची प्रगल्भता आपापल्या कर्मानुसार बदलत जाणार. कधीतरी आपल्यात समत्व येत आपण जेव्हा त्यात विलीन होऊ कदाचित तीच मुक्ती असेल. तोपर्यंत फक्त त्याला पाहून आणि अनुभवून आनंदी होऊयात.
Photo & writeup : Yogesh Kardile
All rights reserved.
Comments