top of page
Writer's pictureYogesh Kardile

ईशान्य भारतातील प्रवास ( भारताची नवी ओळख )


सिसार पूल ( दम्बुक : अरुणाचल ) 

देश देश म्हणजे नेमके काय ? सगळेच एकसारखे जसे कि भाषा, धर्म, कपडे इत्यादी ... अश्या विचारांच्या एक धर्म, एक भाषा बहुल देशांमधून येणाऱ्या लोकांना तर आपल्या देशात शॉकच लागतो. ज्यांना भारत दिल्ली, मुंबई, बंगलोर हैद्राबाद यांच्या पलीकडे माहित नाही त्यांच्यासाठी सुद्धा ईशान्य भारत वेगळाच वाटू शकतो.


सियांग ( ब्रह्मपुत्रा ) नदी ( यिंकियोंग : अरुणाचल ) 


मा कामाख्या, भगवान शिव, भगवान बुद्ध आणि सोबतच आदिम आदिवासी संस्कृतीने हजारो वर्षांपासून या भागातील मानवी संस्कृतीला एक सुंदर आकार दिलाय. वरवर वेगळ्या वाटणाऱ्या विविधतेच्या आत मात्र लपलीय एक चिरंतन संस्कृतीची धारा.


घरगुती हातमागावर काम करणारी स्त्री 


सप्त सिंधूच्या संस्कृतीतील अशी एक विशाल ब्रम्हपुत्रा आणि अनेक नद्यांच्या अनंत धारेवरती ही राज्ये वाढली. त्यातील आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश मध्ये प्रवास करताना आम्हाला आश्चर्याचे सुखद धक्क्यांमागून धक्के भेटले.

स्वच्छ सुंदर घरे व सोबतच सार्वजनिक जागा देखील तेवढ्याच चांगल्या होत्या. आपल्याकडील खड्डे, गटारे रोज रोज अनुभवल्यामुळे या सुंदर गावांची सवय होण्यास जरा अवधी गेला.



बांबूपासून तयार केलेले घर ( अरुणाचल ) 


निसर्गानुरूप बांबूंची घरे, रानभाज्या, ऑर्किड्स, झाडांच्या मुळांपासून तयार केले पूल, हिरवीगार शेती, बांबूचे न संपणारे बन एक ना अनेक गोष्टी थक्क करून टाकणाऱ्या होत्या. विशेष म्हणजे सगळीकडे लोक हिंदी अतिशय उत्तम बोलत होते. त्यामुळे संवाद अतिशय सुलभ होता.


बिहू उत्सवात नृत्य करणारी युवती ( माजुली : असाम ) 


अरुणाचल प्रदेशातील लोक सीमावर्ती भागात असले तरीही भारताशी एकजीव झालेले होते. जेव्हा इतर सीमेजवळील राज्यातील देशविघातक कारवाया पाहतो तसे इकडे काहीच नव्हते.


बिहु उत्सवाचा आनंद घेणाऱ्या मुली ( माजुली ) 

उत्तम रस्त्यांचे जाळे अगदी सर्व प्रदेशात विणलेले. वारंवार होणाऱ्या भूमिस्खलनाने रस्ते वाहून जातात तरी BRO ( बॉर्डर रॉड ऑर्गनायझेशन ) पुन्हा ते नव्याने बांधते. आपल्या छत्रपतींचा पुतळा आणि मराठा लाईट जंगी पलटण सीमेची राखण करताना पाहून ऊर भरून येतो.


सोभार आर्च ब्रिज ( मेघालय - बांगलादेश सीमा ) 


ब्रह्मपुत्रेचे विस्तीर्ण खोरे, तिचे दुसरे टोक कधी कधी दिसत देखील नाही अशा या नदीवर वर्षभर संपर्क स्थापित होईल याकरिता झालेले अनेक पूल ; त्यातलाच एक बोगीबील ब्रिज, भूपेन हजारिका ब्रिज ज्याने अगदी चीनला देखील घाम फोडला.


सेसा बोगदा ( अरुणाचल )


सेला बोगदा जो अतिउंच हिमालयाच्या पर्वतांमधून तवांगला जोडला त्याने आपल्या शेजाऱ्याला सावध केले सगळेच काही अचाट. जेव्हा आपल्या जिल्ह्यात छोटी मोठी डोंगरातली गावे दुर्गम म्हणून घोषित होतात आणि वर्षानुवर्षे तिथे रस्ते, पाणी आणि विजेची मारामार असते पण त्याच्या चार ते आठ पट उंच डोंगरांमधून सुंदर रस्ते आणि घनघोर अरण्य पाहत आपण आरामात जातो तेव्हा या कामाची किंमत कळते.



बोगीबील ब्रिज ( आसाम ) 


आपल्या देशाला जेव्हा आपण नावे ठेवतो तेव्हा काहीही आवाज न करता सतत कार्य करीत राहणारी ही माणसे पाहून आपण यत्किंचित आहोत याची जाणीव होते. सरकार आमच्यासाठी काय करते हा प्रश्न जेव्हा आपण विचारतो तेव्हा त्यांनी काय केले आहे हे पाहण्यासाठी आपण आपला देश देखील पाहायला पाहिजे !



मिसिंग आदिवासी कलाकारासोबत रागिणी ( कमलबारी : आसाम ) 


देशाच्या सर्व सीमावर्ती राज्यांना भेट दिल्यावर भारत सरकारला मनापासून धन्यवाद देऊ वाटते. अंतर्गत सुधारणा जितक्या गरजेच्या तितक्याच सीमावर्ती राज्यांना मदत, रस्ते आणि सुविधा करणे गरजेचे आहे.


सेला बोगद्याच्या रस्त्यावरील सैनिकी स्मारक ( अरुणाचल ) 

लाखो लोकांचे जीवन जेव्हा सुकर होते तेव्हा त्या रस्त्यांचे, ब्रिजचे महत्व आपल्याला प्रत्यक्ष त्यांच्यावर प्रवास केल्याने कळते. विद्यार्थी, आजारी लोक, पर्यटक, व्यापारी, सैनिक असे अनेक लोक दुर्गम भागाशी जोडले जातात.


सेला पास ( अरुणाचल )  


अरुणाचल, आसाम आणि मेघालयातील लोकांच्या वागण्यातून त्यांचे देशावर प्रेम दिसून येते. आमच्या भारतभरातील प्रवासात ईशान्य भारतात लोकांकडून अतिशय उत्तम वागणूक मिळाली. कदाचित मातृसत्ताक संस्कृतीचा परिपाक म्हणून असेल परंतु कुठेही चुकीची नजर किंवा त्रास झाला नाही.


सांगती गावातील एक शाळकरी मुलगी पेमा ( अरुणाचल ) 


सपाटीपासून सुरु झालेला प्रवास जेव्हा घनदाट अरण्ये, रोरावत जाणाऱ्या नद्या, हिमालय पर्वत आपण ओलांडतो तेव्हा या अफाट कामाची व्याप्ती कळते. हजारो वर्षांपासून ज्या देशाला धर्माने, देवी देवतांनी, उत्सवांनी, संगीताने जोडून ठेवले ते आपण या जन्मी तर नक्कीच पाहायला हवे.


लिव्हिंग रूट ब्रिज ( मेघालय ) 


आपण फक्त वर्तमानातच जगात नसतो तर भूतकाळाने आकार दिलेली व भविष्य घडविणाऱ्या साखळीतील आपण एक कडी असतो. त्यालाच लोक कदाचित संस्कृती म्हणत असतील. ती पुढच्या पिढीसाठी जपण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी असते. जशी ब्रम्हपुत्रा अनंत काळापासून वाहते तसेच मानवी संस्कृती तिच्या काठावर फुलत आलेली आहे.



BRO बॉर्डर रोड्स ओर्गानायझेशन कर्मचारी कार्यरत असताना  ( अरुणाचल ) 


निसर्गातील वैविध्य, वन्यजीवन, कलाकुसर या बाबतीत अतिशय समृद्ध असा ईशान्य भारत हा आपलाच भाग आहे. अंतर जरी लांब असले तरीही पूर्वीसारख्या अडचणी आता राहिल्या नाहीत. सरकारने केलेल्या सुविधांमुळे हा प्रवास खूपच सोपा झाला आहे.


ऱ्होडेडेंड्रॉन फुलोरा ( अरुणाचल ) 


आयुष्यात कधीतरी भारताचा हा सुंदर आणि विशाल भाग नक्की पहा. म्यानमार, बांग्लादेश, भूतान आणि तिबेट सारख्यांचा शेजार असलेला हा हिरवागार पाचूसारखा प्रदेश आपल्याला अनुभवसमृद्ध करून जाईल.


पसीघाट जवळील घनदाट अरण्य ( अरुणाचल )


या सर्व प्रवासात अनेक मित्र आणि मैत्रिनी झाल्या. अनेकांनी मार्गदर्शन आणि मदत केली. खास करून Wanderrides Car rentals यांच्यामुळे आमचा प्रवास एकदम मस्त झाला. त्यांच्याकडून गाडी भाड्याने घेऊन सेल्फ ड्राइव्ह करीत २० दिवस ईशान्य भारतात मस्त भटकंती केली. 


कालभैरव मुर्ती  ( कामाख्या मंदिर परिसर ) 

माँ कामाख्या मंदिरापासून सुरु झालेला प्रवास पुन्हा तिच्याच दारी संपविला. तुम्हीदेखील सेल्फ ड्राइव्ह करून संपूर्ण ईशान्य भारत आपल्या प्रियजनांसोबत फिरू शकता. रस्ते, पूल आणि मोबाईल नेटवर्क बहुतांश ठिकाणी अतिशय उत्तम आहे. अगदी दुर्गम पहाडी भागात देखील. 

कामाख्या मंदिर परिसर


जिकडे रस्ते नीट नाही तिकडे स्वस्तात हेलिकॉप्टरची सुविधा देखील असते.





पोबित्रा बिहू मिरवणूकमधील भक्त ( असाम )


 पुन्हा एकदा नव्याने आकार घेत असलेला भारत आपणदेखील नव्याने पाहायला हवाच. जय हिंद !



नामेरी राष्ट्रीय उद्यान परिसरातील दोन बहिणी ( असाम )


ब्रह्मपुत्रा परिसरातील शेती ( असाम )



चहाचे मळे  - दिब्रुगढ परिसर ( आसाम )



चेरापुंजीतील वळणदार रस्ते ( मेघालय )


 शब्द आणि छायाचित्रे: योगेश कर्डीले yogesh kardile 

K Raginee Yogesh K Vasundhara Yogesh


41 views1 comment

Recent Posts

See All

1 Comment


Manisha Ghooi
Manisha Ghooi
May 12

Visiting East India has been on my bucket list , but this is an amazingly beautiful virtual tour- very well captured and composed. Great Work --Thank you

Like
bottom of page