top of page
Writer's pictureYogesh Kardile

कला साधना आणि कलाकार


खजुराहो


ज्या देशात अजिंठा, वेरूळ, खिद्रापूर सारखी लेणी , मंदिरे जागोजागी भूतकाळात तयार झाली त्या महाराष्ट्राची काळी माती किती सुपीक असेल ? अनेक शतके कलाकारांचे पीक येथे येत असेल ना ! गाथा सप्तशती सारखी उत्तम प्रेमकाव्ये आणि समाज वर्णने, ज्ञानेश्वरी, गाथा अशी उत्तमोत्तम शब्द रत्ने तर संत नामदेवांची वाणी तर पंजाबात सर्वदूर पसरली. अशा महाराष्ट्रात आजही उत्तम कलाकार आहेत. परंतु एक अतिशय खेदजनक गोष्ट अशी आहे कि कला आणि तिचा आस्वाद कसा घ्यावा याविषयी राज्यकर्ते, दाते आणि पाहणारे अनभिज्ञ आहेत. ठराविक वर्गच कलेबद्दल बोलतो , लिहितो आणि तिचा आस्वाद घेतो. इंटरनेटच्या काळात जे लोकांना आवडते तेच अल्गोरिदम प्रमोट करितात आणि त्यालाच पैसे मिळते. किलोमध्ये कला निर्मिती केली जाते. काम मिळविण्यासाठी वाट्टेल ते करण्याच्या नादात कलाकार एक व्यापारी होतो. मग प्रश्न पडतो दोष कोणाचा ? पैसे देणाऱ्यांचा कि पैश्यासाठी कलेचा बाजार करणाऱ्यांचा ? समाजातील शक्तिशाली वर्ग समाजाची अभिरुची ठरवितो. मग जर तो समाज अंधारात ठेवायचा असेल तर त्याच्या माथ्यावर कचरा कला म्हणून थोपवा किंवा काळही जिथे हतबल होईल असे त्रिकालाबाधित कलाकृती निर्माण करणाऱ्यांना प्रोत्साहन द्या.


बेलूर मंदिर ( कर्नाटका )

पण या सर्वांपासून दूर एका गावातील स्टुडिओत एक पेंटर रोज चित्र काढतो. तेच ते ब्रश स्ट्रोक्स घोटीत पक्के करीत जातो. सकाळी डोहात पोहणे, वेळच्या वेळी जेवण आणि दिवसभर फक्त ब्रश, कॅनव्हास आणि तो. तशीच एक ती घर सांभाळून आसपासचे प्रसंग आपल्या कॅमेऱ्यात टिपणारी. पैसे वाचवून एक एक फोटो प्रोजेक्त करण्याकरिता जीवाचे रान करणारी. एखादा वेडा शेती करीत करीत कथा लिहितो. माहित नाही कधी प्रकाशित होईल. यांच्या सारखे अनेक जण आयुष्याला समरसतेने भिडतात. आपल्या कलेत बुडून त्या विश्वाची रहस्ये सोपी करून आपल्या भाषेत उतरवितात. आणि मागे ठेवून जातात निखळ मनाला भिडणाऱ्या भावना. नवरसाने ओतप्रोत भरलेल्या.



कोपेश्वर मंदिर : खिद्रापूर ( कोल्हापूर )


बाजार रोज गरम असतोच. बोली लावणारा बोली लावून सौदा पक्का करतो. ज्याचा सौदा होतो तो आजचा उगवता तारा होतो. सगळ्यांच्या माना आणि डोळे त्याच्यावरच असतात. पण त्याला उद्याची चिंता सतावीत असते. मनात कोठेतरी अस्वस्थ पोकळी राहतेच. तर दुसरीकडे कलाकार स्ट्रोक्स मागून स्ट्रोक्स मारीत असतो, लेखक आपली लेखणी रात्रीचा दिवस करीत पात्रे जिवंत करतो. कवी अनाहताच्या गाभाऱ्यातून चोरी करीत भावनांचा पडघम वाजवीत शब्द जिवंत करतो. आपल्या शरीर आणि मनाच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाचे सौंदर्य एका आकृतीत उतरवतो. निर्गुणास सगुण साकार बनवतो. कामुक शिल्पांमधून भावना चेतवितो किंवा बुद्धाच्या अर्धोन्मीलित डोळ्यातून वैश्विक प्रेमभावाचा साक्षात्कार घडवितो.


ठिकसे बुद्ध मठ : भित्तीचित्र ( लडाख )

अजिंठ्याची शिल्पे कशी दिवस रात्र जागून दिव्याच्या उजेडात अनेक पिढ्यांनी जिवंत केली असतील ! तुकोबांनी प्रस्थापित समाजाच्या विरोधात उभे ठाकून शब्दांनी क्रांती केली. नामदेवांनी मराठा आणि शीख समाज घडविला. यांची आयुष्ये प्रतिभेच्या स्पर्शाने संपूर्ण झाली. कलाकार हा पूर्णवेळ कलाकार असतो. त्या महामायेच्या प्रतिभेच्या अंशाचा स्पर्श झालेला कालिदासच त्याच्या रूपातून कार्य करीत असतो. कला आणि कलाकार हा भेद तेथेच संपतो.

श्री रंगनाथा स्वामी मंदिर : तिरुचिरापल्ली ( तामिळनाडू )

हवा, पाणी, रक्त आणि प्रकाश हे सर्व सारखेच असले तरी कलाकाराच्या मन आणि शरीराद्वारे ते सौंदर्यातून व्यक्त होतात. त्याचा पप्रत्येक श्वास का कलेसाठीच असतो. त्यामुळे कलेसाठी कला किंवा निव्वळ आनंद वाटण्यासाठीची अभिव्यक्ती म्हणजे कला एवढेच उरते. भगवंताने दिलेले वरदान तो कलेच्या रूपातून समाजासाठी निर्माण करतो. तर समाज त्या कलेच्या रूपातून निसर्गाला कसे पाहावे शिकत असतो. यातील कोणाला सुदैवाने जाणता राजा भेटतो आणि जगासमोर दिव्य लेणी निर्माण होतात. ज्याला तो भेटत नाही तो ती कला एक स्फुल्लिंग निर्माण करून पुढच्या पिढीत चेतवून जातो. कला आणि भक्ती यात दुजाभाव नाहीच. योगी स्वतःला घडवितो तर कलाकार आपल्या प्रतिभेतून कल्पवृक्षासारखे निसर्गातून कला निर्मिती करतो. वाया काहीच जात नाही. ऊर्जा फक्त या रूपातून त्या रूपात खेळात राहते. बाकी बाजार नेहमीच गरम राहतो. शब्द आणि छायाचित्र : के. योगेश सर्व हक्क राखीव.

113 views0 comments

Comments


bottom of page