सह्याद्रीची उत्तुंग शिखरे जेव्हा एका ठिकाणी अचानक कड्याच्या रूपात उभी राहतात आणि खाली कोकणाला वाट करून देतात त्या पश्चिमेकडे मुख असेलेल्या डोंगरांच्या भिंतींना कोकण कडा म्हणतात.असे अनेक कोकणाकडे नंदुरबार जिल्ह्यापासून ते कन्याकुमारीपर्यंत आहेत जरी त्या भागाला नावे वेगळी असली तरीही कड्यांचे स्वरूप मात्र थोड्याफार फरकाने सारखेच. पावसाळा नियंत्रण करण्याचे कार्य हे कडे अनादी काळापासून करताहेत. घनदाट अरण्ये यांच्या पायथ्याला वाढली आणि त्यामुळेच दुर्गमता.
या सर्व कड्यांमध्ये पहिला नंबर लागतो तो हरिश्चन्द्रगडावरील कोकणकड्याचा. जेव्हा ट्रेकिंग हे फॅड / ट्रेंड नसून एक परंपरा होती. शिवप्रभूंच्या पायवाटांवर इतिहासाची ओळख आणि निसर्गात रमण्याकरिता भटके या आडवाटांवर फिरायचे. त्या वेळेपासून याचे गारुड लोकांच्या मनावर होते.
एका व्यक्तीने स्वतःला या कड्यावरून झोकून दिले इतका तो कोकणकड्याच्या प्रेमात पडला होता. चांगले कि वाईट हा वादाचा विषय इथे आपण घेणार नाही. परंतु अनेकांचा जीव नको ते साहस केल्याने येथे गेलेला आहे. तरी देखील ही पर्वताची निधडी छाती आजही अनुभवल्याशिवाय हरिश्चन्द्रगड ट्रेक संपूर्ण होत नाही. आता येथे रेलिंग झालेले आहे. पायवाट देखील वन खात्याने व्यवस्थित मार्क करून दिली त्यामुळे जाणे येणे भर पावसाळ्यात देखील त्यामानाने सोपे झालेय. वीकेंडला हजारभर लोक तरी नक्कीच येतात. गेली बरीच वर्षे कोकणकड्याचा अनुभव सर्व ऋतूंमध्ये घेऊन झाला तरीही मन मात्र तहानलेलेच. त्यामुळे यावेळी एक आठवड्याचा प्लॅन बनविला. हो एक आठवड्याचा ! इतका वेळ शक्यतो मिळत नाही परंतु आम्हाला तो मिळाला.
जाताना उन्हाळा होता. जरी जून महिना सुरु झाला तरीही पावसाचा मागमूस नव्हता. वर चढताना ऊन डोक्यावर चटकत होते. गडावर दुपारी पोहोचलो. थोडावेळ पंढरीकडे थांबून जेवण केले आणि मोर्चा लगेचच कोकणकड्याकडे वळविला.
जशी संध्याकाळ झाली तसे वातावरण ढगाळ झाले. गार वारा आणि त्यासोबत उडणारे छोटे छोटे खडे. येथे वारा खूप जोरात येतो विशेषतः पावसाळा सुरु होण्याच्या वेळी. ढगांची रांग एका मागोमाग चालू होती.
बुडणाऱ्या सूर्यासोबत ढगांचे रंग देखील बदलत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी परत मोर्चा कड्यावर. साधारणतः मंदिरापासून २० मिनिट चालले की आपण जंगल पार करून आपण येथे पोहोचतो. वरच्या अंगाला गर्द वनराई, पायवाटे जवळ सुकलेली कारवी आणि वाऱ्यासोबत घुमणारे धुके हीच आमची सोबत पुढचे काही दिवस होती. मधेच एका दिवशी काळेकुट्ट ढग एक विचित्र आवाज करीत सर्व डोंगरांवर चाल करून आले. दूरवर विजा खूप जोरात पडत होत्या. ढगांचा आवाज सोडला तर सर्व जंगल चिडीचुप होते. पक्षीदेखील एकदम शांत होते. कधीही न अनुभवलेले ते दृश्य मात्र मनात घर करून राहिले.
सकाळी सकाळी मात्र रोज ढगांची गर्दी वातावरणात असल्याने कधी काहीही न पाहता माघारी फिरावे लागले तर कधी अतिशय सुंदर असे दृश्य देखील दिसले. धबधबा अति वाऱ्यामुळे कड्यावरून उलट परत येतो अगदी तसेच यावेळी ढग कापसासारखे वरती उडत होते. मधेच खालची गावे शुभ्र चादरीत गायब होत होती तर अचानक दिसत होती. सूर्यप्रकाश देखील आपल्या पद्धतीने एवढ्या मोठ्या कॅनव्हासवर चित्र रंगवीत होता. रोज सकाळ संध्याकाळ कड्यावर जायचे. थोडावेळ फोटो आणि व्हिडिओची उत्सुकता शमल्यावर निवांत बसून राहायचे आणि निसर्गाचा खेळ पाहायचा.
खोलवर श्वास घेऊन पुन्हा एकदा नवीन जागा शोधात कड्याच्या अंग खांद्यावर खेळायचे. त्याची रूपे पाहायची. पाऊस सुरु होण्याआधी सर्वत्र पिवळा रंग जो होता ( जंगलातली हिरवीगार झाडे सोडली तर ) तो पुढच्या दोन दिवसात बदलून गेला. रानहळद अचानकपणे उगवली. कारवीला हिरवी पाने फुटली. एका रात्रीत खेकड्यांची फौज बिळामधून बाहेर पडली. इतकेच काय तर आमच्या झोपडीत देखील त्यांचे दोनचार गुप्तहेर सर्व्हे करायला आले. बेडकांचे तर विचारूच नका. जसा जोरदार पावून पडला त्याचा आवाज रात्रभर घुमत होता. मधुचंद्राच्या काळ जो सुरु झाला होता. काजव्यांचा झाडांच्या वरतीचा खेळ जो पावसाच्या आधी सुरु झाला होता तो थोडा कमी झाला. हळू हळू डोंगरदऱ्यांवर ढगांचे अतिक्रमण व संध्याकाळच्या जोरकस पावसाळा सुरवात झाली.
कोकण कडा हा विषय ना ट्रेकिंगचा, ना क्लायम्बिंगचा ना काव्य करण्याचा. हि सर्व आहे आपली हौस; कुठल्यातरी कृतीतून त्याला भेटून आनंद लुटण्याची. त्याचे अस्तित्व हेच निसर्गाचे एक मोठे काव्य आहे. उष्ण लाव्हा पृथ्वीच्या पोटातून बाहेर येऊन थंडावला. पावसाने त्याच्यावर ना जाणो कित्येक शतके अभिषेक केला. वाऱ्याने त्याच्यावरील दगडांचे भेदन करून छोटे खडे आणि मग मातीचा थर बनविला. आणि मग तो सजला हिरवळीने.
हा कडा अजूनही आहे तसाच उभा आहे. अनेक लोक आले आणि गेले. दररोज सूर्य त्याच्या माथ्यावर येतो आणि संध्याकाळी अस्तास जाण्याआधी मात्र ते दोघे एकमेकांचे दर्शन करतात. पावसाळ्यात त्याच्या अंगाखांद्यावर खेळण्याचा हक्क मात्र असतो तो फक्त ढगांना आणि वाऱ्याला. आणि त्याची साथ देत आहे येथील निसर्गचर. हजारो खेकडे, कीटक, साप, बिबटे, आणि कदाचित वाघ देखील. याचा पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेला परिसर सोडला तरीही त्याचे दोन खांदे बऱ्यापैकी दूरवर पसरलेले आहेत. तेथे मात्र राज्य आहे शांततेचे.
तिकडे गेल्यावर वाटते आपण एका वेगळ्याच दुनियेत गेलोय. थोडी भीती देखील वाटते. कारण येथे ना रेलिंग्ज, ना माणसे फक्त मोकळी हवा आणि जंगल. दूरवर पसरलेले आजोबा, कलाडगड, भैरोबा, कोंबडा, नाफ्ता, दुडी, करंडा, घनचक्कर, सीतेचा किल्ला असे एक ना अनेक डोंगर. जणूकाही एखाद्या रक्षकाप्रमाणे सजग उभे आहेत असे वाटते. तसा हाही आपला भ्रमच. निसर्गाच्या चक्राचे ते जुने साथीदार. आपण मात्र त्यांच्यातूनच जन्म घेणारे बुडबुडे कालांतराने परत पंचतत्वात विलीन होणारे.
लिखाण, छायाचित्र आणि व्हिडीओ : योगेश कर्डीले
सर्व हक्क राखीव.
Comments