बऱ्याच वर्षांपूर्वी जेव्हा काजवा महोत्सव ह्या शब्दाने जन्म घेतला नव्हता तेव्हा अनेक रात्री काजव्यांसोबत जंगलात घालविला होत्या. यावेळी एका मोठ्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा त्यांना भेटायला जंगलात गेलो होतो. जागा अर्थातच सह्याद्री. सर्वत्र अंधार सोडून आजूबाजूला दुसरे काहीच दिसत नव्हते. परंतु त्यांच्या सिक्रेट जागा जुना सोबती असल्यामुळे माहित होत्या. विशिष्ट झाडी सुरु झाली आणि मग मी गाडीचे लाईट ऑफ केले. थोडेसे धाडसच होते परंतु हळू हळू त्यांच्या हालचाली सर्वत्र दिसायला लागल्या. फोटो खरेच त्यांना टिपायला कमी पडतात. बराच वेळ तर आम्ही नुसते बसून निसर्ग दीपकांची आरास पाहत होतो. दूरदूरवर वस्ती नव्हती आणि जंगलातला रस्तादेखील सुनसान होता. परंतु त्यांना पाहण्याचा आनंद इतका मोठा होता की आमच्या एकटेपणाला आम्ही विसरून गेलो होतो.
पुन्हा एकदा मी लहान झालो. वसुंधरेला तिचे बालपण आठवून दिले जेव्हा आमच्या भंडारदऱ्याच्या घरात रात्री खिडकीतून ही चोर काजवे मंडळी आत घुसखोरी करायची. आणि मग बराच वेळ त्यांचा खेळ वसुंधरा ( सहा महिन्याचे बाळ असताना ) एकटक पाहत राहायची. तिची ती नजर आम्हाला आजदेखील आठवते. आयुष्य किती श्रीमंत असते ना या छोट्या छोट्या क्षणात! यावेळी तिला पुन्हा एकदा त्यांना डोळेभरून पाहता आले.
काजवे दर्शन जेव्हा जेव्हा होते त्या प्रत्येक वेळी निसर्गाची नित्य नुतनता, सौंदर्य पाहून मन स्तिमित होते. निसर्गाच्या चक्रात प्रत्येक दिवस काहीतरी नवीन घेऊन येतो. कोणी फुलते तर कोणी कोमेजते. पण हि सृष्टी मात्र सतत उत्सवमग्न असते. आता डोंगरात पाऊस सुरु झालाय. ही मंडळी गायब देखील झाली असतील. पण पुन्हा एकदा ते परत चमचम करतील आणि संपूर्ण झाडी उजळून निघेल.
नवीन माहिती समजली आज खूप छान वाटले