रसरशीत लाव्हा रस करोडो वर्षांपूर्वी पृथ्वीच्या उदरातून वर उफाळून आला. दूरदूरवर उकळता रस आणि ज्वालांचे थैमान शांत होऊन तयार झालेला हा भूखंड. कालांतराने हिरवळीचे पांघरून घेऊन तो निद्रिस्त झाला. उन्हाळ्यात मात्र वाहणारे वारे आणि चटकणारे ऊन त्याचे रूप दाखवितात. काळाकभिन्न दगड रूपात दिसतो. कुठे प्रचंड भिंत, डोंगर तर कुठे सपाट मैदानाच्या रूपाने अवशेष रूपात आता तो उरलाय. पण याचमुळे आपल्याला लाभलीय काळीशार माती आणि खनिज समृद्ध असलेले गोड पाणी.
माळशेज घाट आणि हरिश्चन्द्रगड
यावेळेस आम्ही नगर, पारनेर, माळशेज आणि नाणेघाट परिसर भटकंती केली. कोकण बाजूस असलेले दाट जंगल, घाटमाथ्यावरचे सदाहरित वृक्ष, टेकड्यांवरची पानगळीची झाडी, खुरटी होत जाणारी झुडुपे आणि मग गवताळ कुरणे हे सर्वच या प्रवासात दिसले. साधारणतः १५० किमी अंतर असणाऱ्या या भागात हे सर्वच दिसते. प्राणिजीवन, लोक-संस्कृती, शेती, नद्या , तलाव व शेततळी हे सर्व वैविध्य अनुभवास येते.
नागमोडी नदी, शेती आणि नाणेघाटाकडे जाणारा रस्ता
संपूर्ण भारत वर्षात शूर लोकांची कमी नाही. परंतु मराठे ( यात दक्खन मधील सर्व लोक आले ) वेगळे उठून का दिसतात ? तर मला वाटते कि या लाव्ह्याच्या सहवासात राहून, त्याच्या कठोर पाषाण खंडांवर राज्य करताना ऊन, वारा, पाऊस झेलून, त्या दगडात मुरलेले पाणी आणि अन्न खाऊन येथील लोक देखील त्याच्यासारखीच कणखर बनली असतील. थोडे तो बाणा आपल्या अंगी येण्यासाठी आपण देखील त्या पठाराच्या सहवासात जायला हवे नाही का ? विचार करा एखादा शेतकरी , धनगर किंवा कारागीर उन्हातान्हात राबतो. तेव्हा सर्वस्वी त्याचे आयुष्य हा निसर्गच घडवीत असेल ना ? अडचणी या आयुष्याचा भाग जरी असल्या तरी त्यांना सामोरे जायला तोच अन्न, पाणी आणि वारा या रूपात येऊन मदत करीत असेल. जसा परिसर तशीच माणसे.
दूरवर पसरलेले पठार , पारनेर
कधी कधी निरुद्देश भटकंती ठरवून केलेल्या सफरींपेक्षा जास्तच देऊन जाते. त्यातीलच हा एक प्रवास. तुम्ही देखील लाव्ह्याची ही रूपे अनुभवायची असतील तर नक्कीच भटकू शकता. खाली काही छायाचित्र जोडली आहेत. नेहमीपेक्षा यावेळी आमच्यासोबत चिमणी ( ड्रोन ) असल्याने एक वेगळाच अँगल मिळाला. आणि त्यामुळे साधारण वाटणाऱ्या गोष्टी खरेच किती सुंदर असू शकतात हे अनुभवायला मिळाले. आपल्या घराच्या आसपास देखील निसर्ग त्याचे सौंदर्य आणि ऐश्वर्याची उधळण करीत असतो. गरज आहे ती थोडे थांबण्याची आणि मोकळा श्वास घेऊन तो अनुभवण्याची.
कोरडे पठार , पारनेर
काही भागांमध्ये फिरताना असे वाटते कि आपण राजस्थानमध्ये तर नाही ना ! लांबवर बिलकुल झाडी नाही. फक्त मेंढ्या आणि त्यांना घेऊन फिरणारे धनगर कुटुंब. पण येथे कदाचित अचानक हरीण, काळवीट तुम्हाला आडवे जाऊ शकतात, लांडगे आणि कोल्हे देखील. आणि सुंदर छोटे छोटे पक्षी सुद्धा.
छोटेसे गाव आणि विस्तीर्ण जलाशय : मुळा नदी
मुरबाड ते नगर यामध्ये राहण्याची सुविधा भरपूर ठिकाणी उपलब्ध आहे. खासकरून माळशेज आणि नगर येथे भरपूर हॉटेल्स / रिसॉर्ट्स आहेत. रास्ता अतिशय चांगला असल्याने गाडी चालवायला मजा येते. अधेमधे कोठेही आडबाजूला जाऊन परत महामार्गावर तुम्ही येऊ शकता. पिंपळगाव जोगे धरण, मुळा नदीचे जलाशय, हरिश्चन्द्रगड, थिदबीचे जंगल, नाणेघाट परिसर, माणिक ओझर जलाशय, पारनेर येथील गवताळ कुरणे, टाकळी ढोकेश्वर, सिद्धेश्वर येथील शिव मंदिर असे बरेच काही पाहावयास आहे.
नदीतील बेट
मेंढ्या, धनगर आणि वस्ती
पाणवठ्यावरची मेंढ्यांची रांग
सुरेख नांगरलेली शेती
अंगठीतील रत्न की शेततळे ?
नाणेघाटातील सूर्यास्त
जर तुम्हाला अजून माहिती किंवा मदत हवी असल्यास आम्हाला संपर्क करा : ९७४०९३२२४८
अनेकदा या भागात फिरलो आहे पण आपण दिलेल्या माहितीमुळे हा भूभाग नव्याने समजला.
अतिशय सुंदर छायाचित्रे व तितकीच सुंदर माहिती....!