वनराईने वेढलेले शिव मंदिर
बऱ्याच दिवसांपासून कुठेतरी एकांतात ( म्हणजेच जंगलात ) जाऊन काही दिवस राहायचे होते. नेहमीच्या प्रमाणे आयुष्य जगताना थोडे बाजूला येऊन स्वतःला निरखून पाहायचे होते. एवढी वर्षे जी धावपळ चालू आहे ती खरेच गरजेची आहे का ? शिवाय सिंधुसागर फोटो प्रदर्शन नुकतेच झालेले होते. त्याच्या कामातून देखील थोडा श्वास मिळाला होता. मग ठरले सोबत शिवमहापुराण वाचायचे. संकल्प केला आणि मनात निर्णय घेतला कि ते वाचन आणि ध्यान हरिश्चंद्रगडावर जाऊनच करायचे. ग्रंथ बरेच आधी घेतले होते. परंतु गडावर जायला संधी चालून आली नव्हती. यावेळी मात्र ती मिळाली.
धुक्याने वेढलेली कारवी
सुरवातीला एकटा जाणार होतो. मग रागिणी म्हणाली माऊला ( वसुंधरा) पण घेऊन जा. तीदेखील काहीतरी शिकेल आणि निसर्गात रमेल. मग अचानक ती स्वतः देखील यायला तयार झाली. कमीत कमी सामना घेऊन जायच्या ऐवजी चार सॅक्स, टेन्ट आणि किराण्याची बॅग एवढे सामान झाले. पण पाचनईत पंढरी आणि त्याची टीम असल्याने मनात म्हटले सगळे मॅनेज होईल. सहा जूनला गडावर मुक्कामी जायचे होते. विचार होता शिवछत्रपती राज्याभिषेक दिवसानिमित्त गडावर दीप लावून साजरा करूयात. परंतु नेहमीप्रमाणे घर आवरणे, काही बाकी कामे संपविणे यात खूपच वेळ गेल्याने आम्ही घरातूनच ३ वाजता निघालो.
गर्द वनराई
आणि मग पाचनईत पोहोचेपर्यंत रात्रीचे १०: ३० वाजले. आमचा मार्ग होता ओतूर - ब्राम्हणवाडा - कोतुळ - कोथळा आणि पाचनई. कोतूळ पासून पुढे वस्ती विरळ आहे. सोबत डोंगर, जंगल आणि सुनसान वाटेची. परंतु रस्त्यात काजवे ( ठराविक ठिकाणी ) प्रचंड दिसले. मनात म्हंटले चला शिवराज्याभिषेक दिवशी काजव्यांची रोषणाई पाहायला मिळाली.
पंढरी आमची वाट पाहत होता. आम्ही सोबतच जेवायला बसलो. बऱ्याच गप्पा झाल्या आणि साधारणतः १ वाजता झोपलो. अंग मोडून आले होते. आदल्या दिवशी खूप काम पडल्याने सकाळी थकवा आला होता. त्यामुळे मी फक्त छोटी सॅक घेतली. वसुंधरा आणि रागिणीने मात्र मोठ्या सॅक घेतल्या. ऊन डोक्यावर आले होते. पाऊस तर कुठेच दिसत नव्हता. त्यामुळे संपूर्ण रस्त्यात आम्ही घामाघूम झालो.
शून्यागार आणि हरिश्चन्द्रेश्वर मंदिराचा कळस
अनुभव
बऱ्याच दिवसांनी गडाला भेटत होतो. जंगल अजूनही तसेच आहे. मध्ये रेलिंग्स केल्यामुळे ट्रेक एकदम सोपा झाला आहे.
कॅलेंडरप्रमाणे पावसाळा सुरु झालेला होता परंतु निसर्गात त्याचा मागमूस दिसत नव्हता. परंतु वेदर अँप मध्ये पुढच्या दोन दिवसात पाऊस सांगितलेला होता. मागील अनुभवाप्रमाणे त्यामुळे तयारी करूनच गेलेलो होतो. ऊन मी म्हणत होते. अशा वातावरणतात वजन वाढल्यामुळे गडावर चढताना घाम निघाला. परंतु घाई नव्हती. हाताशी वेळ भरपूर असल्याने मन देखील शांत होते. आरामात निसर्गाचा आस्वाद घेत मार्गक्रमण चालू होती. दोन तासात गडावर पोहोचलो. पुढचा आठवडाभर आता फक्त निसर्ग आणि मी. एकदाचे पंढरीच्या झोपडीवर पोहोचल्यावर मस्त जेवण केले. आणि मग प्रयाण केले ते थेट शून्यागारात.
धुके आणि हरिश्चन्द्रेश्वर
शून्यागार : हरिश्चन्द्रेश्वर मंदिर समोर आणि तारामती शिखराच्या पायथ्याला ज्या काळ्या कातळात गुहा खोदल्या आहेत. त्यांच्यामध्ये ज्या एकदम लहान गुहा असून ज्यांना फक्त एक कोनाडा आणि छोटासा दरवाजा आहेत त्यांना शून्यागार म्हणतात. साधारणपणे त्यांचा उपयोग साधू किंवा योगी ध्यानासाठी करतात. शून्यागारातून हरिश्चन्द्रेश्वराचा कळस आणि उंबराची झाडे दिसत होती. अतिशय पुरातन अशा या गुहांचे तोंड मंदिराकडे असण्यास निश्चितच कारण असणार. आत वातावरण थंडगार होते. स्वच्छ गुहा आणि आत येणार प्रकाश. कोणाचाही व्यत्यय नाही. मनात विचार आला माझी पात्रता तरी आहे का येथे बसायची ? हजारो वर्षांपासून येथे कोणी महात्मा, योगी किंवा गुरुकुलातील अध्यापक ध्यान करीत असतील. त्यांच्या व्हायब्रेशन्सने हा भाग पवित्र झाला आहे.
नंदी
माझ्यातला मीपणा तर अजूनही खूपच कडवा आहे. पण येथे येण्याची बुद्धी झाली हेही नसे थोडके. स्वतःला शोधण्याच्या सात दिवसातील पहिला दिवस. जगाला स्वतःच्या मनाचे रंग न लावता पाहणे शिकण्याची सुरुवात. येथे तप केलेल्या सर्व योग्यांना आणि देवाधिदेव महादेवाला नमस्कार. थकून आल्यामुळे गुहेतील थंडावा अजूनच हवाहवासा वाटत होता. मन रिते होण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. मन खूप शांत आणि प्रसन्न झाले. काही काळ ध्यान केले. मग थोडा वेळ लिखाण. समोर मंदिराचा कळस आणि त्यावर फडकणारा भगवा ध्वज दिसत होता. पहिला दिवस हळू हळू पश्चिमेकडे कलला तसे मी वसुंधरा आणि रागिणी यांना घेऊन कोकणकड्याकडे प्रस्थान केले. पाठी मागून पंढरी देखील आला. वातावरण एकदमच वेगळे होते. गार वारा वाहत होता. ढगांची एकामागोमाग एक रांग लागली होती. वाटले आज पाऊस पडणार. कड्यावरचे ते दृश्य मनात आणि कॅमेऱ्यात साठवून माघारी परतलो.
पुष्करणी
वनराई : येथे झाडी विशेषतः डोंगर उतारावर जास्त होती. पठारे तशी बोडखी पण गवत, रानफुलांच्या वनस्पती, कारवी यांनी व्यापलेले. उन्हाळा संपत जरी आला होता तरी पाऊस नसल्यामुळे रखरखीत पठाराच्या मध्ये आणि डोईवर जंगल उठून दिसत होते. सदाहरित वनराईमुळे येथे फिरणे आणि वाऱ्यावर हलणारी झाडे पाहून मन उल्हसित होत होते. आणि जेव्हा धुक्याची लाट यायची तेव्हा तर संपूर्ण जंगल गूढरम्य बनायचे. त्यातून येणारी पक्ष्याची शीळ स्वर्गीय भासायची. रोज सकाळी सकाळी पाऊस असो किंवा धुके दूर जंगलातून पक्ष्यांचा किलबिलाट वेळेवर सुरु व्हायचा. थोडेसे मनोरंजन देखील होते आणि अंधारात देखील मनाला धीर वाटे. अर्थातच प्रातर्विधी एकट्याने लांबवर जाऊन करावा लागल्यावर कुठे खुट्ट झाले कि थोडी भीती वाटते. म्हणजे मला तरी वाटते. हळूहळू मात्र सवय झाली.
केदारेश्वर गुफा
पावसाचे स्वागत : निसर्गातील बदल. श्रावणातील पाऊस अतिशय सुंदर असतो. परंतु जेव्हा तो पहिल्यांदा येतो ते रुप रौद्र असते. त्याचा अनुभव मात्र डोंगर माथ्यावर आणि सागरकिनारी राहणार्यांना येतो. त्याचे आक्रमणकारी रूप. दाट काळ्या रंगांपासून करड्या रंगाच्या विविध छटा. संध्याकाळचा कृष्ण निळा रंग. हे सर्व अनुभवायचे होते. कोकणकड्याने सर्व भरभरून दिले. पांढराशुभ्र कापूस ते गच्च भरलेले मेघ आणि सोबत होता विजांचा हार. हरिश्चन्द्रेश्वराच्या मंदिरात शिवमहापुराण वाचीत असताना अचानक सोसाट्याचा वारा सुटला आणि मग जोरदार फटाके फुटवे तसे वीज एक एक करीत डोंगरावर कोसळत होत्या. महादेवावर भरोसा ठेवून माझे वाचन चालू होते. त्याच्या मंदिराच्या सर्व बाजूंनी विजांचे हार या पर्वतशिखरांवर कोसळत होते. ढग आणि धुके जंगलाला सर्व बाजूने व्यापून उरले होते. दूरवर ढगांची रांग पूर्वेकडे एकमेकांना ढकलत मार्गक्रमण करीत होती.
केदारेश्वर शिवलिंग
हरिश्चन्द्रेश्वर मंदिर : गडावरचे सर्वात महत्वाचे आणि लक्षात येईल असे ठिकाण म्हणजे गडावरचे हरिश्चन्द्रेश्वर ( शिव ) मंदिर. हे ठिकाण साधनेसाठी निवडले. तारामती शिखरावरून पहिले तर संपूर्ण परिसर अनोखा दिसतो. दोन डोंगरांच्या बेचक्यात पर्वत शिखराखाली आणि सर्व बाजूंनी जंगलाने वेढलेला हा मंदिर, कुंड आणि गुहा परिसर. खूप विचार करून आपल्या पूर्वजांनी याची बांधणी केलेली. निरव शांतता काय असते त्याची प्रचिती या सर्व परिसरात येते. मला लहानपणापासून देवपूजेचा खूप कंटाळा. आई बळेच देवपूजा करायला लावायची. यावेळी मात्र ठरवून रोज शिवलिंग पूजन करणे झाले. जंगलातील पवित्र वातावरणात मंदिराची सेवा करणे खूप आनंददायी अनुभव होता. पूजा ही देवासाठी नसून आपल्या शरीर आणि मन शुद्धीकरणासाठी असते याचा उलगडा येथे झाला. घनगंभीर वातावरणात शेकडो वर्षे जुन्या मंदिरात कुंडातील पवित्र पाणी आणून शिवलिंगावर अभिषेक आणि स्वच्छता करणे हा अनुभव ग्रंथ वाचण्यापेक्षा जास्त मोलाचा वाटला. ज्ञानासोबतच सेवाभाव आणि नम्रता याची वैयक्तिक गरज आहे हे येथे पटले.
हरिश्चन्द्रेश्वर शिवलिंग
साधनेचे पहिले पाऊल पूजा आणि स्वच्छता हे होते. त्यानंतर मग शिव महापुराने वाचणे, टिपणे काढणे , ध्यान करणे आणि मग कोकण कड्यावर निसर्गात ध्यान लावणे. मंदिराच्या गुहेमध्ये नंदी महाराजांच्या शेजारी बसून ग्रंथ वाचायचो.
अनेक गोष्टींचा उलगडा येथे झाला. त्यातील काही येथे सांगू वाटतात.
नभ मेघांनी आक्रमिले
भगवान शिव ही एकमेव अशी देवता आहे कि जिची साकार आणि निराकार अश्या दोन्ही रूपात पूजा होते. एक म्हणजे मूर्ती स्वरूपात आणि दुसरी लिंग स्वरूप. प्रणव म्हणजेच ओंकार हा आकार, उकार, मकार, बिंदू आणि नाद स्वरूप आहे.
त्यात सर्वात अनोखी गोष्ट मात्र कोकणकड्यावर गेल्यावर उलगडली. पर्वत हा शिवलिंगाकार असून साक्षात शिवाचेच स्वरूप असतो तर धरती हे शक्तीचे स्वरूप असते. हे वाचताना ठीक वाटते. परंतु जेव्हा तुमच्या आसपास सर्वत्र शिवलिंग दिसू लागतात तेव्हा त्या श्लोकाचा उलगडा होतो. कड्यावर उभे असताना चोहोबाजूंनी आम्हाला सर्वत्र शिवलिंगाकार पर्वतशिखरांनीच घेरलेले होते. नाफ्ता, सीतेचा किल्ला, रोहिदास, मोरोशीचा भैरवगड, नाणेघाटातील शिखरे, तारामती शिखर तर साक्षात पिंडी सारखेच होते. इतकेच काय तर या सर्व शिखरांच्यावर पडलेला पाऊस तिन्ही बाजूंनी गोळा होऊन दरीत हरिश्चन्द्रेश्वर आणि केदारेश्वर शिवलिंगांवर वर्षाव करीत होता. पूर्वज निसर्गात भगवंताचे स्वरूप पाहत होते आणि आपण त्यांना दगडात देव पुजणारे म्हणतो.
डोंगरावर मुक्त विहार करणाऱ्या गोमाता ( डांगी प्रजाती )
सह्याद्रीतील शिवलिंगे म्हणजे धरित्रीच्या गर्भातील उफाळून आलेल्या लाव्ह्याने तयार झालेली आहेत. आणि त्यांना थंड ठेवण्याचे कार्य पार पडताहेत येथील टाकी जी वर्षभर पाण्याने भरलेली असतात. ऊर्जा हि अग्निरूपात, वायू, जल, रस, आणि नाद रुपात असते. येथे तर ऊर्जेचे भांडारच होते. त्यामुळे ज्या जागी हजारो वर्षे प्रसन्नतेने मंत्रजागर घडला असेल ती जागा खंडित जरी असली तरीही तेथील दगड आणि अवकाशात ती ऊर्जा प्रतिबिंबित होत असणार. म्हणूनच कुठल्याही पुरातन शिवमंदिरात प्रसन्न वाटते. करोडो पंचाक्षरी शिवमंत्र, महामृत्युंजय मंत्र, तप आणि पूजा येथे योगी, ऋषी, साधू, सामान्यजनांना येथे केल्या असतील. त्यामुळे लांबवर प्रवास आणि ट्रेक करून थकून जरी आला तरी मंदिरात आल्यावर प्रत्येकाला आनंदच मिळतो.
तुडुंब भरलेले ढग
केदारेश्वर : मला तशी थंड पाण्याची अलर्जी आहे. लवकर सर्दी होते. त्यामुळे थंडीत किंवा पावसाळ्यात मी शक्यतो थंड पाणी टाळतो. परंतु यावेळी महादेवावर विश्वास ठेवून त्याचा नामघोष करीत केदारेश्वराच्या कुंडात रोज बुड्या मारल्या. एकट्याने सकाळी सकाळी थोडी भीती वाटली. एकदा तर वाटेत विषारी साप दिसला. परंतु हि त्याचीच भूमी असल्याने त्याला नमस्कार करून कुंडात बुडी मारली. अनुभव असा आला कि एकदा पाण्यात गेल्यावर दिवसभरात कधीही थंडी वाजली नाही आणि उत्साह टिकून राहिला. डोंगराच्या पोटातील पाण्यात नक्कीच जादू आहे. त्याची चव आणि अंगावर पाणी घेतल्याने शरीरात एक ताजेपणा येतो. रोज महामृत्युंजय मंत्राचे उच्चारण त्या गुहा आणि कुंडात म्हणताना प्रतिध्वनी ऐकायला मस्त वाटायचे. जणू काही एखाद्या रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये आहे असा भास होत होता.
संध्याकाळचा नाणेघाट आणि कोकण परिसर
कोकणकडा : यावेळी कोकणकडा वेगळ्या कारणाने पाहायचा होता. मनसोक्त अनुभवायचा होता. चक्क रोज दोनदा त्याच्या काठावरून फिरायचे , खेळायचे आणि स्वस्थ बसायचे. कधी नव्हे ते यावेळी शक्य झाले. जेव्हा मी कोकणकड्यावर गेलो आणि आसपासचे नाफ्ता, कोंबडा, दुधी, आजोबा, मोरोशीचा भैरवगड, नाणेघाटातील अंगठा, रोहिदास आणि तारामती हिखर पहिले तेव्हा अचानक शिवमहापुराणातील तो श्लोक आठवला. ज्यात सांगितले होते कि पर्वत शिखरे हि शिवलिंगस्वरूप असून धरणी हि प्रकृती स्वरूप आहे. येथे तर शिवलिंग सर्व बाजूंना होते. जसे हिमालयात पंच केदार , पंच कैलास तसेच आपल्या सह्याद्रीत प्रत्येक पर्वतावर किंवा त्याच्या पायथ्याला शिव मंदिर आहेच. प्रत्येक शिखर पवित्र मानले गेलेले. हा कोकणकडा वेगवेगळ्या कारणाने प्रत्येकाला आकृष्ट करीत आलाय. त्याच्या काठावर बसून आनंदात काठोकाठ डुंबून प्रत्येकजण आठवणी घेऊन घरी जातो तो पुन्हा परत येण्या करीता.
बाप लेक आणि सह्याद्री
कोकणकड्यावरून दिसणारे दृश्य एकाचवेळी स्वतःच्या लहानपणाची जाणीव करून देणारे तर दुसऱ्याचवेळी स्वतःला याच निसर्गाचा भाग असण्याची भावना जागृत करणारे. कोकणकड्याला वेगवेगळ्या अंगांनी अनुभवले. त्याच्यावर येणारे धुके, कृष्ण मेघ आणि त्यांची फौज, उघडे पडलेले काळेशार खडक आणि पहिला पाऊस पडल्यावर बाहेर आलेले खेकडे, बेडूक, साप, गांडूळ, कारवीला फुटलेली पालवी, रानहळद आणि दूरवर शीळ घालणारा पक्षी.
कृष्णा आमचा सांगाती
सोबत :
एक एक दिवस पदरात संचित जमा करीत होता. आणि मी जुने संचित नष्ट करीत होतो. शिकणे आणि विसरणे याची प्रक्रिया एकाचवेळी सुरु होती. कोहम कडून सोहमचा प्रवास प्रत्येक श्वासागणिक चालूच होता. नव्हे तो सुरु असतोच परंतु यावेळी थोडा जाणीवपूर्वक होता. धडपड येथून पुढे चालूच राहील. कुठल्याही प्रतिमेचा गुलाम न होता प्रत्येक वेळेस नवनवीन प्रयोग करीत आयुष्य अनुभवत राहील. ज्या गोष्टींबद्दल मनापासून वाटते त्यावर व्यक्त होईल. जेव्हा जेव्हा केदारेश्वराचे कुंड पाहतो तेव्हा ते बनविणाऱ्यांचे हात आठवतात. ते तयार करणाऱ्या कारागिरांनी दात्यांकडून पैसे जरूर घेतले असतील परंतु शेकडो वर्षे त्यांचे काम आपली तृष्णा भागवितेय. महादेवासोबत आपल्याशी नाते जोडतेय. आपले काम ही पुढच्या पिढीसाठी असेच हवे नाही का ? पुढच्या पिढीची तहान भागविताना त्यांच्या पूर्वजांशी, निसर्गाशी आणि विश्वनियंत्याच्या स्वरूपाशी नम्र होणारे. अर्थार्जन करीत असताना मोक्षाचा साक्षात्कार घडविणारे. कदाचित आपण हे करू शकू. कदाचित नाही. परंतु संकल्प करून त्यामार्गावर वाटचाल तर नक्कीच करू शकतो.
नाफ्ता, आजोबा, घनचक्कर, कुमशेत आणि पेठेची वाडी परिसराचे विहंगम दृश्य
येथील शून्यागारात बसून बराच वेळ शिवमंदिराचे शिखर आणि उंबराची झाडी न्याहाळत मन शांत झाले. निघताना मन अजून थांब सांगत होते परंतु गावातून आलेल्या एका व्यक्तीने निरोप दिला कि आमची आंब्याच्या झाडाखाली लावलेल्या गाडीवर मुलांनी आंबे पाडण्याकरिता फेकलेल्या दगडांमुळे पुढची काच फुटलीय. म्हंटले महादेवाची इच्छा झाली आता येथून निघा. ग्रंथ संपलेला नव्हता. तो आता घरी वाचायचा. चला त्यामुळे एक चांगली सवय अंगवळणी पडेल.
ध्यानस्थ रागिणी : कोकणकडा
ते सात दिवस खरेचच अफलातून होते. पण प्रत्येक दिवस हा परीक्षा पाहणारा होता. अगदी घरी पोहोचेपर्यंत. परंतु प्रत्येक परीक्षा नवीन प्रसंग समोर टाकून पेचात टाकायची. आणि मग त्यानुसार होणारी मनाची प्रतिक्रिया आणि स्वतःच्या वागण्याकडे त्रयस्थ पणे पाहायला शिकवीत होती. रोज रात्री लवकर झोप लागायची तर सकाळी पहाटेच जाग यायची. किमान चारवेळा तरी डोंगरावर फिरणे व्हायचे. त्यामुळे शरीरात एक चपळता आली. भरपूर घाम निघाला. फुफ्सात भरपूर प्राणवायू भरून घेतला. गावठी जेवण, रानातील आंबे, करवंदे, जांभळे, आळीव सर्व काही मनसोक्त खायला मिळाले. चहा देखील भरपूर पिला आणि शेवटच्या दिवशी तो कायमचा सोडला. उन्हाने त्वचा रापली गेली परंतु मनसोक्त सूर्यनारायणाची कृपा सर्वांगावर झाली आणि पावसाचे स्वागत करायला मिळाले.
माळशेज घाट परिसर
गडावरील दिवस एक दिशादर्शक म्हणून आयुष्यात साठविले जातील. पुन्हा पुन्हा तिकडे पाय वळतील. रोजचा दिवस कितीही धावपळीचा असो तरी मनामध्ये मात्र मी परत त्या शून्यागारात थोडावेळ का होईना जाईनच. आपण कोणी साधू नाही. तरीही मनामध्ये साधूवृत्ती बाळगण्याचा प्रयत्न मात्र रोज करू शकतो. ज्या परमेश्वराने येथपर्यंत आणून सोडले तोच पुढचा प्रवासात सांगाती राहील. मग त्याच्यावरच सर्व काही का नको सोडावे ? कर्तव्यरूपाने कर्म करीत मन बाजूला सारण्याचा प्रयत्न चालूच राहील. जेव्हा केव्हा मन उद्विग्न होईल तेव्हा ते सात दिवस परत आठवतील.
तारामती शिखर
वसुंधरा आणि रागिणी या दोघीनींही आपापल्यापरीने निसर्गाचा आस्वाद घेतला. वाचन, चित्रकला, स्वयंपाकात मदत, योगासने आणि ट्रेक्स असा त्यांचा दिवसभराचा कार्यक्रम असायचा. विशेषतः वसुंधरेला पाऊस कसा येतो आणि सह्याद्रीची वैशिष्ट्ये समजण्यास या दिवसांमुळे खूपच मदत झाली. शेवटच्या दिवशी तर रानफ़ळे खाण्याचा जास्त आनंद तिने मनसोक्त घेतला. प्रत्येकाने असे काही दिवस टेक्नॉलॉजीशिवाय एकटे नाही तर सहकुटुंब व्यतीत करावे. कधीतरी आपण नक्कीच जंगलात किवां एखाद्या ट्रेकला भेटूयात. धन्यवाद.
निसर्गाशी एकरूप होण्याचा अविस्मरणीय अनुभव!!!..
केवळ आणि निव्वळ अप्रतिम